उत्तर प्रदेशात निसर्गाचा प्रकोप! १० जणांचा मृत्यू, ६ जण गेले वाहून; नद्यांना पूर, परिस्थिती गंभीर

Foto
लखनौ : उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील नद्यांना पूर आला असून परिस्थिती गंभीर झाली आहे. प्रयागराज, सोनभद्र, मिर्झापूर, बांदा, महोबा, बिजनौर आणि इतर जिल्ह्यांमध्ये पूर आणि पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये ६ जण वाहून गेल्याची माहिती असून १० जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे.

प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नद्यांची पाण्याची पातळी वाढल्याने सखल भागात पाणी शिरलं आहे. शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. कौशाम्बी येथील महेवाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाला. पावसादरम्यान छप्पर कोसळून एका शेतकर्‍याचा जीव गेला, तर घर कोसळल्याने ६ जण जखमी झाले. 

सोनभद्रच्या ओबरा भागात बिजुल नदीला पूर आला आहे. मिर्झापूरमध्ये कर्णावती नदी पार करताना अशफाक आणि अडवा नदीच्या पुलावर पाय घसरल्याने धर्मराज हे दोघे वाहून गेले. एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीम्स त्यांचा शोध घेत आहेत. बिजनौरमध्ये गंगेची पाण्याची पातळी वाढल्याने खादर भागातील गावांमध्ये पुन्हा पाणी शिरू लागले आहे. रायपूर खादर गावाला चारी बाजूंनी पाण्याने वेढल्यामुळे तेथील वाहतूक व संपर्क पूर्णपणे ठप्प झाला आहे.

मीरापूर सीकरीच्या जंगल परिसरातही पाणी वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. कानपूरच्या फफूंद भागात घराची भिंत कोसळून एका मुलीचा मृत्यू झाला. कन्नौजमध्ये ढिगार्‍याखाली दबून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सततच्या पावसामुळे घरं आणि भिंती कमकुवत झाल्या असून अनेक दुर्घटना होत आहेत.
अरिल नदीत आंघोळीसाठी उतरलेले तीन मित्र पाण्याच्या प्रवाहात अडकले. यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोघांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक नागरिक आणि बचाव दलाने नदीत शोधमोहीम राबवली आहे. सततचा पाऊस आणि नद्यांची वाढती पाण्याची पातळी यामुळे प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. सखल भागात राहणार्‍या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.